१९९० ला मी शेती हा पर्याय स्वखुशीने निवडला. शास्त्रीय वाचन करून प्रत्येक प्रयोग स्वतःच्या शेतीत करून पहिले. चांगले कुजलेले शेणखत / कम्पोष्टखत टाकत राहण्यापासून ते रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर कमी – कमी करत राहण्यापासून सुरु झालेला हा प्रवास वनस्पतींचे अवशेष व प्राण्यांचा ताज्या पदार्थाचे जमिनीवर आच्छादन करून जमीन सुपीक करण्याच्या प्रयत्नांपर्यंत झाला.
आच्छादन तंत्राचा सविस्तर खोलवर जाऊन अभ्यास केल्यानंतर आच्छादनातील पदार्थ थेट शेतात कुजत असताना त्या जमिनीची आपोआप मशागत होते असे संदर्भ थेट पुस्तकात वाचावयास मिळाले त्याची प्रचिती प्रत्यक्ष शेतात आजमवता अली. त्यातून भू – सूक्ष्मजीवशास्त्र (सॉइलमायकोबायोलॉजी) च्या अभ्यासाची गोडी लागली. त्यातून लाखो वर्षे जंगलामध्ये चालत असलेल्या प्राणी, वनस्पती व जिवाणू यांच्या सहजीवनाचे रहस्य उलगडले.
स्वतःची शेती हेच जंगल मानून काम सुरु केले. पीक कापणीनंतर मुळे वळत जातील तशी त्यांची जाडी कमी होऊन खोलवर पोकळ्या तयार होतात. यातून पाण्याचा निचरा होतो अवशेष कुजत असताना निर्माण होणाऱ्या डिंकामुळे जमिनीची दाणेदार कणरचना तयार होते. काष्ठमय पदार्थांच्या कुजण्यातून तयार झालेली कणरचना पाण्यात टिकाऊ राहते. आणि महत्वाचे म्हणजे सेंद्रिय पदार्थ जागेवरच कुजल्याने फळांची मूळ नैसर्गिक चव, स्वाद, सुगंध परत आणता येतो याचा अनुभव आपण घेत आहात जमिनीत घडणाऱ्या जैवरासायनिक क्रियेचा हा परिपाक आहे.
झाडांना कळी निघत असतानाच किमान ५० – ६० मधमाश्यांच्या वसाहती येऊन लोखोंच्या संख्येने मधमाश्या दिवसभर नैसर्गिक परागीभवन करतात त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढतच जाते. मी एक रानमाणूस आहे. जंगलशेतीतील हि अस्सल नैसर्गिक फळे आपणास देत आहेत. आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी मदत करत आहेत हे ऐकून आयुष्यभराच्या प्रयोगाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
धन्यवाद !